नातं निसर्गाशी

लेखिका: मेधा इनामदार, पुणे

खूप जुनी ऐकलेली …. वाचलेली गोष्ट आहे. तशी तर प्रत्येकालाच माहिती असलेली.

एक आजोबा दाराशी एक आंब्याचं रोप लावत होते.  थकलेली कुडी.  थरथरणारे हात. कुणी एकानं ते पाहिलं. विचारलं. 

‘आजोबा , रागावू नका. रहावत नाही म्हणून विचारतो. पण तुम्ही हे झाड आत्ता लावताय् . या वयात. याची फळं कदाचित ……. ’ 

‘ कदाचित ते आंबे खायला मी नसेन , होय ना ? ’ आजोबा हसून म्हणाले. 

बोलणारा किंचित ओशाळला .

‘ पण खरं सांगू , निसर्गानं आत्तापर्यंत इतकं दिलंय् ना की वाटतं , आता हे वैभव पुढच्या पिढीपर्यंत पोचायला हवं. मी नसेन. पण माझी मुलं , नातवंडं , माझया पुढच्या कितीतरी पिढया या आंब्याची चव घेतील. हे समाधानच माझयासाठी पुरेसं आहे. प्रत्येक कृतीतून आपला स्वतःचाच फायदा व्हायला हवा असं नाही. निसर्गाचा वसा पुढेही चालवायला हवाच ना ? ’ 

आजोबा म्हणाले आणि त्यांनी आपलं काम पुढे सुरु केलं. 

ते रोप जमिनीत रुजलं … अंकुरलं….. 

किती सुंदर नातं आहे हे आजोबांनी जपलेलं …?

निसर्गासोबतच हे नातं. एका जन्मीचं नव्हे. अनंत जन्मांचं. अनंत पिढयांचं. न पाहिल्या देखल्या पुढच्या जगासाठी ! फक्त मनातच नव्हे तर मातीत रुजलेलं. अनंत काळापर्यंत आपण निसर्गाकडून घेतलंय् . अनंत हातांनी तो आपल्याला देतच आलाय्. 

जेव्हा ही पृथ्वी माणसांच्या हाती सोपवली तेव्हा किती निर्मळ होती ?

नितळ आणि स्वच्छ पाणी दोन्ही किना-यांना वाटत धावणा-या स्वच्छ सुंदर नद्या.  विविध प्रकारच्या जलजीवांपासून ते रत्ना – मोत्यांसारख्या जलसंपत्तीचा अथांग खजिना पोटात सांभाळणारे समुद्र….!  आकाशापर्यंत उंच टेकणारे पर्वत आणि तेवढयाच खोल द-या. हिरव्यागार झाडांनी आणि वेलींनी शोभणारी सदाबहार जंगलं.  आणि त्या जंगलासोबतच विविध प्रकारच्या वनौषधींची निसर्गानं केलेली लयलूट. माणसासाठी. इथल्या जीवांसाठी. स्वच्छ मोकळी आणि निरोगी हवा. 

खरं तर  हे सारं परमेश्वरानं माणसाच्या ओंजळीत घातलेलं दान आहे. न दिसणा-या सूक्ष्म जीवांपासून महाकाय आणि अतीकाय प्राण्यांपर्यंत असंख्य जीव या निसर्गाचे अविभाज्य भाग आहेत.  आकाषात मनमुक्त विहार करणारे पक्षी या निसर्गाचे घटक आहेत.  या सा-यांच्या असण्यामुळं निसर्ग अधिकच देखणा होतो. निसर्गाच्या अणूरेणूत सामावलेले हे जीव निसर्गाच्या विरुद्ध वर्तन करीत नाहीत. कधीच नाही. 

निसर्ग स्वतःचं काम अगदी नेटकेपणानं पार पाडीत असतो. ठरलेल्या वेळी सारं काही घडत राहतं. निसर्ग ते घडवीत राहतो. सूर्याचं उगवणं …. मावळणं ….! त्या वेळी क्षितिजावर उमटणारा मोहमयी रंगांचा आगळावेगळा खेळ ! चंद्राचा आकाशातला प्रवास् अन् त्याचं समुद्राच्या भरतीआहोटीशी असलेलं सुरेखसं नातं…. ! एकामागून एक बदलणारे ऋतू …! सगळंच कसं त्या त्या वेळीच. ठरीव सुबकपणाने. 

इतकंच नव्हे तर जन्ममृत्यूचं चक्रही निसर्गाच्या नियमांप्रमाणेच चालतं…… 

निसर्गाचं कामच मुळी एकदम चोख. बिनचूक आणि निश्चितपणे निसर्ग त्याचं काम बजावत असतो.

पण त्याच निसर्गातून निर्माण झालेला माणूस मात्र हा प्रामाणिकपणा …. अचूकपणा विसरुन गेला.

कसा कोण जाणे पण तो आपल्या डोळयांनी निसर्गाकडे पहायला लागला. स्वतःच्या बुद्धिनं चालायला लागला. स्वार्थ आणि अर्थ ! माणसाला दोन्ही साधायचं होतं. मग कसलाच विचार न करता  त्यानं निसर्गाच्या कामात ढवळाढवळ करायला सुरुवात केली.

पहाता पहाता सगळं काही विसकटत गेलं. अन्न वस्त्र आणि निवारा या नैसर्गिक गरजा ख-याच. निसर्गाने त्या प्रत्येकाला सढळ हाताने पुरवल्याही होत्या. पण माणसाला मात्र ते त्याच्या इच्छेप्रमाणं हवं होतं. त्याला हवं तसं. त्याला हव्या तशा रुपात. 

अर्थात जे हवं ते मिळवावं आणि ते अधिक सुंदर करुन मिळवावं ही बुद्धिही निसर्गानंच माणसाला दिली. माणसानं त्या बुद्धिचा योग्य वापर करायला काहीच हरकत नव्हती. पण माणसानं आपल्या गरजा वाढवायला सुरुवात केली. गरजा वाढल्या तसा हव्यास वाढला. 

आराम मिळाल्यावर माणसाला चैन हवीशी वाटू लागली. माणसानं मग जन्म देणा-या निसर्गालाच वेठीला धरलं. प्रगतीच्या नावाखाली हवं तसं ओरबाडायला सुरुवात केली. निसर्गाचे नियम न पाळता निसर्गाची संपत्ती लुटायला सुरुवात केली. मग हे करताना त्यानं फक्त स्वतःचाच विचार केला. आपल्याबरोबर या पृथ्वीवर रहाणा-या सोबत्यांनाही इथेच रहायचंय् आणि त्यांनाही काही गरजा आहेत हा विचार माणसाच्या मनाला शिवलासुद्धा नाही. 

नकळत नव्हे तर समजून उमजून माणूस निसर्गावर अतिक्रमण करु लागला. 

मातीशी असलेली आपली बांधिलकी तोडू लागला. प्रगतीची स्वप्नं पहाताना अधोगतीची वाट चालू लागला. पंचमहाभूतांपैकी प्रत्येकालाच माणूस डिवचू लागला. 

आज वेगवेगळया प्रकारच्या कितीतरी कारखान्यंामधून कितीतरी प्राणघातक रसायनं आज हवेत आणि पाण्यात मिसळली जात आहेत. रोजच्या रोज वाढत चालेलल्या वाहनांच्या धुरातून बाहेर पडणारा कार्बन मोनोक्साईड हवेतल्या आॅक्सिजनची पातळी कमी करतो आहे. फार काय आपल्या अंतराळयानांमधून आणि उपग्रहामधून बाहेर पडणारा अंतराळातला कचरा अवकाशाच्या पोकळीत त्याच्या वेगानं फिरतो आहेच. माणसाच्या न संपणा-या हव्यासापायी पाणी प्रदूषित होतंय्. हवा प्रदूषित होतेय् जंगलं तोडली जाताहेत. त्यांच्या आश्रयानं रहाणारे प्राणी पक्षी बेघर होत चालले आहेत. कितीतरी प्राण्याच्या प्रजातिंचा नाश होतो आहे. निसर्गाचा समतोल बिघडतो आहे.. पर्यांवरणाची लय विसकटते आहे. निसर्गानं जे जे दिलं , ते सारं आपण बिघडवलं. प्रदूषित केलं. 

खरं तर माणसाचा जन्मच मुळी निसर्गाच्या कुशीतून झालाय्. पंचमहाभूतांच्या घडणीतूनच माणसाची निर्मिती झाली आहे. पृथ्वी ,आप ,तेज, वायू, आणि आकाश ही पंचमहाभूतं म्हणजेच हा निसर्ग. तो आपल्याही मनात आणि शरीरात रुजलेला आणि वसलेला आहे. अर्थातच माणसाचं आणि निसर्गाचं नातं जिवाशिवाचं. निसर्गाशिवाय माणूस जगूच शकणार नाही इतकं घट्ट. 

अखेर प्रत्येक नात्यात देण्याघेण्याचे हिशोब आहेतच.  

एकानं फक्त देतच रहायचं आणि दुस-यानं फक्त घेतच रहायचं असं एकेरी नातं अखेर कुठेतरी संपतंच ना …? माणसाचं आणि निसर्गाचं आता असंच झालंय् …..    

निसर्गाचा न्याय तितकाच सरळ आणि स्पष्ट आहे…………. 

कळत नकळत केलेल्या चुकीला निसर्ग कधीही क्षमा नाही करीत. चुकून जरी विस्तवावर पाय पडला तरी तो भाजतोच….. कारण हाच निसर्गाचा न्याय आहे.  

जन्मतः मिळालेलं सुंदर आणि निरोगी शरीर माणसं स्वतःच्या चूकीनं दूषित करीत रहातात. …….. 

सुुंदर आणि स्वच्छ मोकळी हवा माणसंच वेगवेगळया कृत्रिम रसायनांमुळे आणि वायूंमुळे प्रदूषित करीत रहातात ……….. 

माणसं स्वच्छ आणि निर्मळ नदयाचं आणि समुद्राचं पाणी विशारी रसायनं आणि द्रव्यानं अशुद्ध करीत राहतात ….. 

जंगलं , झाडं , ओढे नाले , डोंगर द-या सगळंच ….. माणसं सगळं काही एकापाठोपाठ एक प्रदूषित करीत चालली आहेत ………………….. 

त्या जंगलांच्या ,झाडांच्या आणि पाण्याच्या आश्रयानं रहाणा-या प्राण्यांना आणि पक्ष्यांना बेघर करीत आहेत ………….

………….. म्हणूनच निसर्गही त्याचं काम करतोय् ….. त्याच्या न्यायाप्रमाणे …. कळत असो नकळत . केलेल्या चुकीला शिक्षा ही असायलाच हवी………. 

म्हणूनच …………………

आज माणसं अवेळी मृत्यूमृखी पडत आहेत …………………

मृत्यूसाठी वाटयाला येणारे मार्गही अनैसर्गिकच आहेत ……………न ऐकलेली दुखणी आणि कधीही न पाहिलेले विषाणू …… अनाकलनीय रोग , आजार  ….अपघात …….

कधी न अनुभवलेले …., भूकंप , त्सुनामी ……पूर , वादळे ,अवर्षणे आणि दुष्काळ ….

खरं तर निसर्ग आपल्याला पुढच्या प्रचंड सर्वनाशाची लहानशी चुणूक दाखवतोय् …. कल्पना देतोय् …. सांगतोय् ……….

‘‘ तुम्ही माझीच मुलं आहात …. म्हणून आधीच कल्पना देतोय् …. आताच शहाणे व्हा …

नातं फक्त एकाच बाजूनं नाही जपता येत . तुम्हीही ते जपा …. नाहीतर ………. सर्वनाश ठरलेलाच !!

‘ खरंच आपणही शहाणं व्हायला हवं ना …? विझत चाललेल्या नात्याला पुन्हा नवंसंजीवन देअून ………..

…………निसर्गाशी असलेलं आपलं नातं आपण जपायला हवं. कारण निसर्गाची काळजी घेणं म्हणजे आपण स्वतःचीच काळजी घेणं आहे. आपण हे जग जेव्हा पुढच्या पिढीच्या हाती सोपवू तेव्हा ते सुंदंर ,हिरवंगार आणि तितकंच सुसंपन्न असायला हवं.

कारण तोच आपला पिढीकडे सोपवला जाणारा वारसा असेल………………..!

कसं वाटलं? आम्हाला कळवा info@haritamarathi.com वर.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s